Narendra Singh Tomar : शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केलं. भारताची सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि शेतकर्‍यांसाठी किंमत समर्थन प्रणाली जगात अनोखी आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या सर्वांगीण विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा भर असल्याचेही तोमर म्हणाले. भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे तोमर म्हणाले.

  


भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण


शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांची आठवी बैठक कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. आज भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. हे आपल्या धोरणकर्त्यांची दूरदृष्टी, कृषी शास्त्रज्ञांची कार्यकुशलता आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे तोमर म्हणाले. भारत तृणधान्ये, फळे, भाज्या, दूध, अंडी, मासे यासारख्या अनेक वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर आहे. नवोन्मेष, डिजिटल शेती, हवामानाधारित स्मार्ट तंत्रज्ञान, उच्च उत्पन्न देणाऱ्या, बायोफोर्टिफाइड वाणांचा विकास, कृषी संशोधन यात एकत्रित प्रयत्न करून देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे तोमर म्हणाले. भारत बहुपक्षीय, राजकीय, सुरक्षाविषयक, आर्थिक स्थिती आणि लोकांशी संवाद वाढवण्यासाठी एससीओ सोबतच्या ऋणानुबंधांना महत्त्व देत असल्याचे तोमर म्हणाले. दरम्यान, शांघाय सहकार्य संघटनेने भारताच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट कृषी कृती योजना स्वीकारली आहे.


PM किसान योजनेअंतर्गत 2.40 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा


देशातील अत्यंत महत्त्वाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, याअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला देय असलेले 6,000 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 2.40 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. बैठकीच्या प्रारंभी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा यांनी स्वागतपर भाषण केले. कृषी संशोधनात सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा सरकारचा प्र.यत्न असल्याचे तोमर म्हणाले. शांघाय सहकार्य संघटना सचिवालयाचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उच्च अधिकारी आणि एससीओ सदस्य देशांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.