Agriculture News : राज्यात सातत्यानं तापमानात (Temperature) चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं (Rain) देखील हजेरी लावली आहे. या बदलत्या वातावरणाचा (Climate Change) शेती पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. या बदलत्या वातावरणामुळं रब्बी पीकं (Rabi Crop) धोक्यात आली आहेत. कापूस, तूर, हरभरा तसेच भाजीपाला पिक्काचं 20 ते 25 टक्के नुकसान होण्याची वर्तवण्यात आली आहे.


उत्पादनात घट येणार


उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले आहे. दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्र देखील गारठला आहे. तिथेही तापमानाचा पारा घसरला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काह ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. अशा बदलत्या वातावरणामुळं राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण याचा पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं उत्पादनात घट येणार आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.


किडींसोबत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव


बदलत्या वातावरणामुळं पिकांवर किडींसोबतच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. किडींचा प्रादुर्भाव आणि धुक्यामुळं तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर तूर आणि हरभऱ्याचा फुलोरा गळतो. गव्हाची पाने पिवळी पडतात. मोसंबीचा अंबिया बहार गळत आहे. तसेच आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच आंब्याच्या झाडांना लागलेला मोहर या ढगाळ वातावरणामुळं कमी होत आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 


कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत 


कोकणात उशिरानं थंडी सुरु झाली. त्यामुळं कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. दरम्यान, सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे. कारण वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणाऱ्या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : कोकणात थंडी उशीरा सुरु, आंब्यासह काजू उत्पादक चिंतेत; यंदा हापूस उशिरा मिळणार