MSP: लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांना (Farmers) मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. सरकार गव्हासह अनेक पिकांच्या हमीभावात (MSP) वाढ करण्याची शक्यता आहे. हा निर्णय सरकार लवकरच घेण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये गव्हाच्या MSPमध्ये 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.


गव्हाच्या एमएसपीमध्ये 150 ते 175 रुपयांची वाढ होणार


पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या  निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. मोदी सरकार रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. याचा फायदा देसातील करोडो शेतकऱ्यांना होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार गव्हाच्या एमएसपीमध्ये 150 ते 175 रुपयांची प्रति क्विंटलमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या राज्यांमध्ये सर्वाधिक गव्हाची लागवड केली जाते.


मसूरसह मोहरी आणि सूर्यफुलाच्या MSP मध्येही वाढ होणार


केंद्र सरकार पुढील वर्षासाठी गव्हाच्या एमएसपीमध्ये तीन टक्के ते 10 टक्के वाढ करु शकते. केंद्र सरकारने तसे केल्यास गव्हाची किमान आधारभूत किंमत 2 हजार 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकते. सध्या गव्हाचा एमएसपी 2 हजार 125 रुपये प्रति क्विंटल आहे. याशिवाय सरकार मसूरच्या एमएसपीमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. तसेच मोहरी आणि सूर्यफुलाच्या एमएसपीमध्ये 5 ते 7 टक्क्यांची वाढ होऊ शकते. येत्या आठवड्यात केंद्र सरकार रब्बी, कडधान्ये आणि तेलबिया पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देईल अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे MSP वाढवण्याचा निर्णय मार्केटिंग सीझन 2024-25 साठी घेण्यात येणार आहे.


एमएसपीमध्ये 23 पिकांचा समावेश 


केंद्र सरकार कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत ठरवते. 23 पिकांचा एमएसपीमध्ये समावेश आहे, 7 तृणधान्ये, 5 कडधान्ये, 7 तेलबिया आणि 4 नगदी पिके. अशा रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान केली जाते. त्याच वेळी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये कापणी केली जाते.


एमएसपीमध्ये पिकांचा समावेश


तृणधान्ये- गहू, भात, बाजरी, मका, ज्वारी, नाचणी आणि जो
कडधान्ये- हरभरा, मूग, मसूर, वाटाणा, उडीद,
तेलबिया- मोहरी, सोयाबीन, तीळ, करडई, भुईमूग, सूर्यफूल, नायजर बियाणे
रोख- ऊस, कापूस, कोपरा आणि कच्चा ताग


महत्त्वाच्या बातम्या:


Kharip Crop MSP: खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ, भात 143, ज्वारी 235 तर मूग आणि तिळाच्या हमीभावात 800 रुपयांची वाढ जाहीर