Dattatray Bharne : राज्यभरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात पिकांची मोठी हानी झाली आहे. अतिवृष्टीचा सर्वच जिल्ह्यांना फटका बसत असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पुर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. याबाबत आता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. हवामान बदलामुळे एकाच वेळेस मोठा पाऊस होतोय. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 30 जिल्ह्यात 195 तालुक्यात 654 महसूल मंडळामध्ये 62 लाख 17 हजार 540 एकर क्षेत्रात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. यावर सरकारचे लक्ष आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, अधिकारी नुकसानीची पाहणी करत आहे. ज्यांचे नुकसान झाले, त्याबाबत पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिली आहे. 

हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी 

राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरु असल्याने शेतकरी आणि विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यात मागणी केली जात आहे. याबाबत विचारले असता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे. अजून पाऊस सुरुच आहे. सगळा विचार करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

30 जिल्ह्यात शेतीचं नुकसान

दरम्यान, नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे.  सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांना फटका बसला आहे.

आणखी वाचा 

Nashik Crop Damage : नाशिकमध्ये अतिवृष्टीने शेतीचं प्रचंड नुकसान, चार हजार हेक्टरवरील पिकं बाधित, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, सरकारकडून मदतीची प्रतीक्षा