Manikrao Kokate : शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे; कर्जमाफीच्या प्रश्नावर काय म्हणाले कृषीमंत्री? मुख्यमंत्र्यांचा दिला दाखला
Manikrao Kokate : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची योग्यवेळी कर्जमाफी करु, असे वक्तव्य केले होते. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

Manikrao Kokate : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप कर्जमाफीबाबत (Loan Waiver) कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "कर्जमाफीबाबत मी अतिशय संवेदनशील आहे. कर्जमाफी कधी द्यायची, याचे काही नियम आहेत आणि त्यासाठी ठरलेली प्रक्रिया असते. सरकारने दिलेला एकही शब्द आम्ही मागे घेणार नाही. योग्य वेळी, योग्य निर्णय घेतला जाईल," असे वक्तव्य केले होते. आता कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी भाष्य केले आहे.
कर्जमाफीच्या प्रश्नावर काय म्हणाले कृषीमंत्री?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कोपरगाव येथे माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांचा विचार लवकरच कार्यान्वित होईल. शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत. मात्र कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी मथळे आहे. तर बोगस बियाणे आणि औषधांसंदर्भात ज्या कृषीसेवा केंद्राच्या बाबतीत तक्रार दाखल होईल, त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. माझ्याकडे तक्रार आली तर मी लगेच कारवाई करणार आहे, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
सरकारी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल
सरकारने शेतीत भांडवली गुंतवणूक करावी ही माझी धारणा आहे.सरकार पाच वर्षात 25 हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी खर्च करणार आहे. परदेशी धर्तीवर भारतातल्या शेतकऱ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. सरकारी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असेही माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रस्सीखेच सुरू आहे. या पदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे दादा भुसे आपापल्या पक्षातून आघाडीवर आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचेही नाव चर्चेत आहे. यात अलीकडे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याने, नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव पुढे आले आहे. त्यामुळे या पदासाठी आता चार संभाव्य दावेदारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता नाशिकच्या बाबतीत फार विवाद नाहीत. पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही. मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
























