(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Singapore Open 2022 : सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये सिंधूसमोर चीनचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
Singapore Open 2022 : भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये जपानच्या सेईना कावाकामीचा पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली असून फायनलमध्ये तिचा सामना वांग झी यी हिच्याशी होणार आहे.
PV Sindhu in Final Singapore Open : टेनिस विश्वातील एक मोठी स्पर्धा असणाऱ्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत (Singapore Open 2022) भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) थेट अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. तिने सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत अखेर उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या सेईना कावाकामीचा (Saena Kawakami) पराभव केला आहे. ज्यामुळे आता तिचा सामना चीनच्या वांग झी यी हिच्याशी होणार आहे. दुसरीकडे भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehal), पुरुष गटात एचएस प्रणॉय (HS Pranoy) यांना मात्र फायनलमध्ये पोहोचता आले नसून ते उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत झाले.
सिंधूने सर्वात आधी बेल्जियमच्या लियान टॅनला 21-15, 21-11 च्या फरकाने मात देत दुसऱ्या फेरीत जागा मिळवली. त्यानंतर सिंधूने गुरुवारी व्हिएतनामच्या लिन ग्युयेनला मात दिली. सामन्यात लिनने पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करत सिंधूला 21-19 ने मात दिली. पण त्यानंतर सिंधूने दमदार असं पुनरागमन करत पुढील दोन्ही सेट 21-19 आणि 21-18 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. मग उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हान युईला सिंधूने 17-21, 21-11, 21-19 च्या फरकाने मात देत उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत जपानच्या सेईना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव करत तिने फायनलमध्ये धडक घेतली आहे. तर हा फायनल सामना कधी आणि कुठे पाहता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
उद्या 17 जुलै रोजी पीव्ही सिंधूचा हा सिंगापूर ओपनमधील चीनच्या वांग झी यी हिच्याविरुद्धचा सामना रंगणार आहे.
किती वाजता होणार सामना?
हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
पीव्ही सिंधूचा हा सामना Sports 18 या चॅनेलवर पाहता येणार आहे. जिओ, टाटा प्ले, एअरटेल डिजीटल प्ले या डिशवर हे चॅनेल उपलब्ध असून वूट या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
हे देखील वाचा-
- Singapore Open: पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक, सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवलं
- Singapore Open 2022 : पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, एचएस प्रणॉयसह सायना मात्र स्पर्धेबाहेर
- Aishwary Tomar Wins Gold: दक्षिण कोरियात भारताचा तिंरगा फडकला; नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ऐश्वर्य तोमरनं सुवर्णपदक जिंकलं!